तेलंगवाडीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
सोलापूर, दि. 20- पुणे- सोलापूर महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ कचरे फार्म गेट समोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात आज शुक्रवार २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब गावाजवळ तेलंगवाडी गावाजवळ कचरे फार्म गेट येथे घडला. यात वरवडे येथे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 EQ 7444 या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव दुचाकी क्रमांक MH 13 AT 3356 ने समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी क्रमांक MH 13 EQ 7444 दुचाकीस्वार तरुणाला डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्या गंभीर जखमीं झालेल्या तरुणाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक प्रमुख उमेश भोसले, सहाय्यक नवनाथ मोरे, चालक बंडू गायकवाड आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील लहू पवार (वय १८ वर्षे रा. वरवडे, ता. माढा, जि सोलापूर ) असे असून या अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे.
















Leave a Reply