देशाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितले तर त्याचा कायदेशीररित्या देखील समाचार घेऊ 

देशाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितले तर

त्याचा कायदेशीररित्या देखील समाचार घेऊ 

ऍड. उज्वल निकम यांचे सोलापुरात प्रतिपादन 

सोलापूर, दि. 30- या देशाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितले तर आम्ही कायदेशीररित्या देखील त्याचा समाचार घेऊ शकतो हाच संदेश प्रहार या चित्रपटातून दिला गेला आहे असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले.

 

सोलापूर येथे डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्यावतीने निकम यांच्या जीवनावर आधारित प्रहार या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निकम यांनी उपस्थित राहून थोडावेळ मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी निकम पुढे म्हणाले की, 26/11 च्या खटल्यादरम्यान कसाबने वेगवेगळी नाटके केली. त्यामुळे कोर्टाबाहेर देखील एक वेगळा जनक्षभ उसळला होता. कसाबला फाशी द्या, खटला चालवू नका, त्याला मारून टाका अशी मागणी होत होती. पण कसाब जवळ जे ओळखपत्र होते ते हिंदू माणसाच्या नावे होते आणि इतर नऊ अतिरेकी जे मारले गेले त्यांच्या जवळ देखील हिंदू नावे असलेली ओळखपत्र होती. याचा अर्थ पाकिस्तानला या माध्यमातून आपापसातील वैर पुन्हा अंतर्गत लढाई त्यांना निर्माण करायची होती. 93 चा बॉम्बस्फोट खटला मी चालवला परंतु त्यावेळी देखील आरोपींना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. ही गोष्ट माहीत होती परंतु त्यावेळी आम्ही पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते. कारण पाकिस्तानचे नाव जर घेतले तर आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील याची भीती आम्हाला होती. 26 /11 च्या हल्याने वेळी देखील अशाच प्रकारची एक अनामिक भीती होती पण माझा जन्म हा हनुमान जयंती दिवशी झाला असल्याने मी कोणाचेही काही ऐकले नाही. या दहा अतिरेक्यांविरुद्ध खटला चालविला. जगाच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे जे नऊ आरोपी मारले गेले त्यांच्या विरोधात देखील आम्ही पुरावे दाखल केले, सिद्ध केले व पाकिस्तानची मिजास उडवून टाकली. उज्वल निकम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा सतत गुन्हेगारांच्या विरुद्ध लढणारा आपला एक भारतीय सैनिक आहे, एवढेच समजा. तुमच्या प्रेमाची शिदोरी मला कायम ऑक्सिजन देत राहील असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *