0
Views
सर्व ठेवीदार, सभासद, खातेदार यांच्या सहकार्यामुळे बँकेने सन २०२५- २०२६ या आर्थिक वर्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदा सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असून लवकरच मल्टीस्टेट साडेतीनशे कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा ओलांडणार असल्याची माहिती जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूरचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली.
सोलापूर येथील श्री टाकळीकर मंगल कार्यालयामध्ये जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑपरेट क्रेडिट सोसायटीची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यासभेच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे हे होते. यावेळी व्यासपीठावर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष संजय जावळे, संचालक पंडित बुळगुंडे, विजय डांगे, नितीन कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अमरसिंह देशमुख, कल्याण राऊत, लक्ष्मीकांत जाधव, रणजित हजारे, सचिन कट्टे, तानाजी तानगावडे, वर्षा विभुते, प्रियांका पाटील, गवळण गायकवाड यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र हजारे म्हणाले, मार्च २०२६ अखेर बँकेने पावणे तीनशे कोटी रूपये ठेविंचा टप्पा ओलांडला आहे. १९८ कोटी ९१ लाख ७६ हजार ४७५ रूपयांचे कर्जवाटप केले आहे. ९१ कोटी ३ लाख ९८ हजार ४४१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी ७१ लाख ७ हजार ६७७ रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एनपीए केवळ एक टक्का असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेने विविध ठेविंवर आकर्षक व्याजदर ठेवले आहे. सध्या मल्टीस्टेटकडून वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, महिला बचत गटांना कर्ज, सोने तारण, ऊस वाहतूक तोडणी कर्ज यासह सर्व विविध कर्ज योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. या माध्यमातून ठेवीदार, कर्जदार आणि समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.
जनकल्याणच्या विविध तालुक्यात २७ शाखा असून येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा, सोलापुरातील जुनी विडी घरकुल, निर्मिती विहार परिसर, शेळगी तसेच कुंभारी आणि वळसंग येथेही मल्टीस्टेटच्या नवीन शाखा लवकरच सुरू करण्याचा मानस आहे.
यावेळी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी मल्टीस्टेटचे अध्यक्ष राजेंद्र हजारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा हजारे यांचे कामाचे कौतुक करून मल्टीस्टेटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुरवसे यांनी केले.









Leave a Reply