
फेसबुकवर खा. प्रणिती शिंदे यांच्यावर
टीका करणे डॉक्टरला भोवले
पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल
ईश्वरपूर, दि. 25- सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोशल मीडियावर टीका -टिपणी करणे वाळवा तालुक्यातील एका डॉक्टराच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सचिनकुमार शिवाजीराव शेळके ( रा. कासेगाव, ता. वाळवा ) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. सचिनकुमार याने अश्लील टिपणी केली होती. त्यामुळे महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी ऍड. मनिषा चंद्रकांत रोटे ( वय 61, रा. ईश्वरपूर ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. शेळके याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य ऍड. रोटे यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादीच्या मोबाईलमधील फेसबुकवर डॉ. शेळके याने कमेंट बॉक्समध्ये फिर्यादी व इतरांच्या विरोधात अपशब्द वापरून शिवीगाळ केली. तसेच अश्लील व मानहाणीकारक शेरेबाजी केली होती. ती टिपणी वाचल्यावर त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच विनयभंग झाल्याने ऍड. रोटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या प्रकरणावरून असे दिसून येते की हल्ली समाजमाध्यमातून एकमेकांविरुद्ध घाणेरडी टीका करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र त्याचा त्रास नंतर आपल्यालाच होतो. याचा बोध प्रत्येक वापरकर्त्याने घेणे आवश्यक आहे. एखादी केस झाली तर कोर्टाच्या पायऱ्या आपल्यालाच झिजवाव्या लागतात. आपलाच वेळ आणि पैसा वाया जातो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
















Leave a Reply