0
Views

रांगोळीतून मोदींच्या कार्याला सलाम;
ईच्छा भगवंताची परिवाराचा अनोखा संदेश
सोलापूर, दि. 18-नवभारताच्या निर्माणासाठी अखंड कार्यरत असलेले आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सर्वोच्च मानून देशाच्या विकासासाठी योगदान देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील श्री गणेश मंदिरासमोर नरेंद्र मोदी यांचे आकर्षक रांगोळीतील छायाचित्र साकारण्यात आले. या रांगोळीच्या माध्यमातून ‘तीन तलाक’विरोधी कायदा, सामाजिक न्याय आणि मुस्लिम महिलांच्या सन्मानाचा संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२०१९ मध्ये ‘तीन तलाक’विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम महिलांच्या विवाहविषयक अधिकारांच्या संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले. याच सामाजिक संदेशाला रांगोळीच्या माध्यमातून अधोरेखित करत ईच्छा भगवंताची परिवाराने मोदींच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला. प्रारंभी श्री गणरायांच्या चरणी विधिवत पूजा करून दीपप्रज्वलन व महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एका पदावर असलेले नेतृत्व नसून देशाच्या विकासाची आणि राष्ट्रहिताची नवी दिशा दाखविणारे नेतृत्व आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, सन्मान आणि समान संधी मिळावी, यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला ‘तीन तलाक’विरोधी कायदा हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश देणारा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.
ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने रांगोळीच्या माध्यमातून मोदीजींचे छायाचित्र साकारून त्यांना शुभेच्छा देण्यामागे केवळ वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश नाही, तर त्यांच्या राष्ट्रकार्याला आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना सलाम करण्याची भावना आहे. श्री गणरायांच्या चरणी मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि भारताला अधिक सामर्थ्यवान, विकसित व आत्मनिर्भर बनविण्याच्या त्यांच्या कार्याला यश मिळावे, हीच प्रार्थना, असे जाधव यांनी सांगितले.याप्रसंगी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात, नगरसेविका अश्विनी चव्हाण, चैत्राली गायकवाड, स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजीखाने, ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक दायमा, नगरसेविका वृषाली चालुक्य, नगरसेविका कल्पना कदम, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतन गायकवाड, कार्तिक जाधव, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, सुनील कांबळे व परिवार तसेच महापालिकेतील विविध संघटनांचे कर्मचारी यांच्यासह ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मागील वर्षीच्या कार्यकाळातील सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे,शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार प्रथमच महापालिकेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.















Leave a Reply