0
Views

सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाने
नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
सोलापूर, दि. 17- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने सोलापुरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू उद्योजक शिखर पहारिया यांच्या फाउंडेशनच्या वतीने शहरात ठीक ठिकाणी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे डिजिटल फलक उभारून व विविध वर्तमानपत्रात जाहिराती देऊन शुभेच्छा देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
उद्योजक शिखर पहारिया फाउंडेशनच्यावतीने मोदी यांचे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आल्याने हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिखर पहारिया यांच्या मावशी असलेल्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र असे असले तरी शिखर पहारिया फाउंडेशन कडून भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणारे फलक का उभारण्यात आले. वर्तमानपत्रांना जाहिराती का देण्यात आल्या हा मुद्दा चर्चीला जात आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर शिखर पहारिया फाउंडेशनचे काम बघणारे राज सलगर यांनी याबाबत फाउंडेशनची भूमिका स्पष्ट केली आहे. राज सलगर यांनी सांगितले की शिखर पहारिया हे एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. ते कोणत्याही पक्षाचे सदस्य अथवा पदाधिकारी नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सेवेचा एक संकल्प केला असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शिखर पहारिया हे सामाजिक क्षेत्रात काम करत असतात. त्यांना सोलापूरकरांची देखील सेवा करायची आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही.
पहारिया भाजपात आले तर त्यांचे स्वागतच
या पार्श्वभूमीवर भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी शिखर पहारिया हे भाजपात आले तर स्वागताच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहेत शिखर पहारिया?
शिखर पहारिया हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. त्यांच्या आईचे नाव स्मृती तर वडिलांचे नाव संजय पहारिया आहे. शिखर पहारिया हे बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे बॉयफ्रेंड म्हणून देखील ओळखले जातात.















Leave a Reply