0
Views

निफाडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात
टेबलवर सोडली दोन मोकाट कुत्री
युवा सेनेच्या निषेध आंदोलनाची सर्वत्र चर्चा
निफाड, दि. 16- मोकाट कुत्र्यांनी सर्वत्रच हैदोस घातलेला असतानाच निफाड शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी चक्क मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोरील टेबलवर दोन भटकी कुत्री सोडून निषेध नोंदविला. युवा सेनेच्या या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अवघ्या काही वेळातच वेगात व्हायरल झाला आहे.
यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांविरुद्ध कसलीच मोहिम उघडली जात नसल्याचे पाहून दोन कुत्री सोडण्यात आली. यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाबही विचारला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की सहा सहा महिने झाले तुम्हाला सांगितले. गणपती बसले, लहान लहान मंडळे आहेत. लहान मुले मंडळापाशी येत जात असतात. मोकाट कुत्र्यांकडून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. तुम्ही मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी आतापर्यंत काय केले. तुम्ही फक्त पैशाची कामे करत बसता. तुम्हाला शुभेच्छा आहेत असे म्हणत त्यांनी पोत्यात भरून आणलेली दोन कुत्री त्यांच्या टेबलवर सोडली. आम्ही पैशांचा हार देखील आणला आहे तुम्ही घाला किंवा तुमच्या खुर्चीला घालू असेही ते म्हणाले. तुम्हाला कुत्र्यांचे व्हिडिओ टाकून देखील तुम्ही कसलीच कारवाई केली नाही यावर मुख्याधिकारी म्हणाले की कुत्र्यांची निविदा काढली आहे हे ऐकताच युवासेनेचे पदाधिकारी म्हणाले की कुत्र्यांच्या निविदेला गोळी घाला. समस्या सुटली का ते सांगा. तुम्ही येथे राहायला आहेत का. तुम्हाला येथील समस्या माहिती आहेत का. पैसे कमवा चांगले, दणादण टेंडरची कामे करा असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान टेबलवर सोडलेली दोन्ही कुत्री घाबरून भिंतीकडे टेबलवरील फायलिंवर जाऊन बसली. एकजण त्यांना काढायला गेल्यावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले त्यामुळे तो माघारी फिरला. तर मुखाधिकारी भामरे हे देखील खुर्चीवर गुपचूप बसून राहिल्याचे व्हिडिओत दिसून आले.
यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.















Leave a Reply