अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी  स्थानिकांनी पूरक व्यवसाय उभारावेत


0
Views

अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी 

स्थानिकांनी पूरक व्यवसाय उभारावेत

आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन

सोलापूर, दि. 16- श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून अक्कलकोटमध्ये येणार्‍या भाविकांच्या गरजा ओळखून स्थानिक पातळीवर पर्यटनपूरक व्यवसाय आणि विविध सेवा-सुविधा निर्माण कराव्यात. भाविकांना व्यवसायाच्या माध्यमातून दिलेली सेवा हीदेखील स्वामींची सेवा समजून प्रामाणिकपणे कार्य केल्यास अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

 

 

 

लोकमंगल परिवार आणि पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथील सर्जेराव सभागृहात पर्यटन क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन व उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार देशमुख बोलत होते.

 

 

श्रीक्षेत्र शिर्डीच्या धर्तीवर अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाचा विकास करण्यासाठी स्थानिक सहभाग महत्त्वाचा आहे. यात्री निवास, भक्तनिवास, होमस्टे, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, कृषी पर्यटन तसेच अन्य पर्यटनपूरक व्यवसायांमध्ये मोठ्या संधी आहेत. महिलांनी या संधींचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. महिलांनी केवळ व्यवसाय सुरू करण्यापुरते मर्यादित न राहता व्यवसायाचे प्रभावी ब्रँडिंग, दर्जेदार उत्पादन, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी मार्केटिंग यावर विशेष भर द्यावा. शासन तसेच लोकमंगल परिवाराच्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे देशमुख यांनी सांगितले.

 

 

पर्यटन संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे यांनी अक्कलकोट हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने धार्मिक पर्यटनासोबतच महिला उद्योजकतेसाठीही येथे मोठ्या संधी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केले. त्यांनी लोकमंगल बँकेच्या विविध व्यावसायिक कर्ज योजनांसह महिला सन्मान योजना, आई’ कर्ज योजना आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली.

 

 

यावेळी मल्लम्मा पसारे, सुनीता भागानगरे, सुवर्णा साखरे, नगरसेवक प्रवीण शहा, शिवशरण वाले, सुरेश सूर्यवंशी, अक्कलकोट तालुका कृषी विभागाचे तालुका सहाय्यक मुस्तफा इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन परमेश्वर जाधव यांनी केले.

 

 

आई कर्ज योजनेचा महिलांनी लाभ घ्यावाः लांघी

पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी अक्कलकोटमधील महिलांनी आई’ कर्ज योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. पर्यटन संचालनालय आणि लोकमंगल परिवाराच्या माध्यमातून महिलांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्जवितरण केल्याबद्दल त्यांनी लोकमंगल बँक आणि आमदार देशमुख यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *