0
Views

गणपती घाटावरील विसर्जन कुंडामध्ये
घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी
मनसेने व्यक्त केली खंत
सोलापूर, दि. 13- सोलापूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस झाला आहे. गणपती घाटावरील विसर्जन कुंडामध्ये मागील वर्षापासूनचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले आहे. हे पाणी इतके खराब आहे की ते भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उद्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि परवापासून दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरू होणार आहे, तरीही महापालिकेला हे कुंड साफ करण्याची साधी तसदी घ्यावीशी वाटलेली नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी व्यक्त केली.
अभिषेक रंपुरे म्हणाले की महापालिका प्रशासनाला गणेशोत्सवाची तारीख माहिती नव्हती का? दरवर्षी गणपती विसर्जन होणार हे माहिती असताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रशासन झोपलेले का आहे? हजारो भाविक आपल्या लाडक्या गणरायाला श्रद्धेने निरोप देण्यासाठी येणार आहेत आणि त्यांना अशी घाण दाखवणार का? महापालिकेने तातडीने हे विसर्जन कुंड पूर्णपणे साफ करून, जुने पाणी काढून, निर्जंतुकीकरण करून भाविकांसाठी सुरक्षित व्यवस्था करावी. गणरायाच्या विसर्जनासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची कृपा नाही, तर त्यांची जबाबदारी आहे. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिकेला जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. गणपती बाप्पाच्या नावावर उत्सवाचे फोटो काढण्यापेक्षा भाविकांसाठी मूलभूत व्यवस्था करा, हा आमचा प्रशासनाला स्पष्ट इशारा आहे. जर लवकरात लवकर जर विसर्जन कुंड साफ केले नाही तर प्रशासनाने जे झोपेचे सोंग घेतलेले आहे ती झोप या दुर्गंधीयुक्त पाण्यात घालवू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अभिषेक रंपुरे यांनी दिला आहे.















Leave a Reply