0
Views

नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा द्या
संभाजी ब्रिगेडची मागणी
सोलापूर, दि. 9- नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या अस्वच्छता, निकृष्ट सुविधा व विविध मूलभूत समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या गैरसोयी तात्काळ दूर कराव्यात या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे उपस्थित होते. जिल्हा परिषदचे खैरादि यांना बोलावून तात्काळ कामे चालू करण्याचे आदेश देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेहरू वसतिगृह चालविले जाते. मात्र, सद्यस्थितीत या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत गंभीर व त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वसतिगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून नियमित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते. तसेच स्वच्छतागृहे व बाथरूम अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहेत. तुंबलेली शौचालये, दुर्गंधी, सांडपाणी व घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसतिगृहातील दरवाजे, खिडक्या तसेच इतर भौतिक सुविधांचीही दुरवस्था झालेली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
विशेष म्हणजे, वसतिगृहाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली असतानाही प्रत्यक्षात नियमित व प्रभावी स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खर्च होत असताना विद्यार्थ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर या संपूर्ण व्यवस्थेची चौकशी होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, दक्षिण तालुका अध्यक्ष जैनुदिन नदाफ, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, कृष्णा पवार, सचिन मोरे, युवराज माने आदी उपस्थित होते.














Leave a Reply