0
Views

खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला
‘टाळा ठोको’ आंदोलनाचा इशारा
सोलापूर, दि. 8- सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून, उभी पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील अचानक बदललेली वीजपुरवठ्याची वेळ, वाढलेले लोडशेडिंग आणि कृषीपंपांसाठी अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल कंपाऊंड सोलापूर येथील एमएसईबी अर्थात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच दोन दिवसांत लोडशेडिंगचा स्लॉट बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर पुन्हा ठिय्या आंदोलन करून एम एस ई बी कार्यालयासमोर ‘टाळा ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वीजपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यात सध्या अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, कांदा तसेच इतर अनेक पिके जळून वाळून चालली आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला तरी अनेक पिके हाताला येण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषीपंप चालविणे आवश्यक असताना वीजपुरवठाच उपलब्ध होत नसल्याने उरलीसुरली पिकेही धोक्यात आली आहेत. शेतकऱ्याला वीज नाही, तर पाणी कुठून मिळणार? असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला.
लोडशेडिंगसाठी निश्चित करण्यात आलेली वेळ शेतकरी व ग्रामीण जनतेला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी संध्याकाळच्या वेळेत होणारे लोडशेडिंग बदलण्याची मागणी केली. संध्याकाळची वेळ ही पाणीपुरवठा, स्वयंपाक, गुरांचा धारा काढण्याची, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि इतर अत्यावश्यक कामांची असल्याने या वेळेत वीजपुरवठा खंडित करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीत लोडशेडिंग म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना आहे. सरकारने शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करून वीजपुरवठ्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
आंदोलनादरम्यान महावितरण प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागातील सिंगल फेज वीजपुरवठा १६ ते २४ तास उपलब्ध करून देण्याबाबत तसेच लोडशेडिंगचा स्लॉट बदलण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खासदार शिंदे यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, आंदोलन, उपोषण आणि निवेदनांची दखल घेण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये राहिलेली दिसत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान सरकार किंवा वीज विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे होता कामा नये, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट, गंभीर पाणीटंचाई आणि पिकांचे नुकसान या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणीही खासदार शिंदे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेणार असून दिशा समितीच्या बैठकीतही हा मुद्दा लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत शाळे, सोलापूर शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राजेश पवार, रणजीत पाटील, महांतेष पुजारी, जयवंत कोळी, मुस्तफा बळोरगी, पंडित पाटील, सत्तार इनामदार, यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply