सोलापूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून चारा छावणी सुरू करा 


0
Views

सोलापूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ

जाहीर करून चारा छावणी सुरू करा 

संभाजी ब्रिगेडची मागणी 

सोलापूर, दि. 7- अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त घोषित करून शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण जनतेसाठी तात्काळ चारा छावणी सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

 

सोलापूर जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी व अनियमित पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेती व्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी, बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला; मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

सोलापूर हा कायमच पर्जन्यछायेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पावसातील थोडीशी तूटदेखील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट निर्माण करते. सध्याची परिस्थिती पाहता अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीचे सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

अल्प पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, कांदा तसेच इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काही भागात पिकांची उगवण व्यवस्थित झालेली नाही, तर काही ठिकाणी उगवलेली पिके पाण्याअभावी सुकत आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होणार असून शेतीचा खर्चही निघण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

पावसाअभावी विहिरी, बोअरवेल, तलाव, बंधारे आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांसाठी आतापासूनच पाणी नियोजन करणे गरजेचे आहे.शेतीसोबतच पशुधनावरही दुष्काळाचा मोठा परिणाम होत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने चारा छावण्या, चारा डेपो आणि पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे.

सोलापूर जिल्ह्यातील सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करावा व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी करून वास्तविक परिस्थितीचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवावा.

 

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी संकटात सापडतो. त्यामुळे केवळ दुष्काळ जाहीर करून मदत देणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. जिल्ह्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे, नदी-जोड प्रकल्पांचा व्यवहार्य अभ्यास, उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण, शेततळी, बंधारे आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोई, शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण, दक्षिण तालुका प्रमुख जैनुद्दीन नदाफ, सविता भोसले, अरविंद शेळके, विश्वजीत गंभीरे, सविता भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *