मोहोळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी


0
Views

मोहोळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची

खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

मोहोळ, दि. 7- सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात आली असून, निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिके जळून जात आहेत. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर करपताना पाहून शेतकऱ्यांची स्वप्नेही जळून चालली आहेत.

 

या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील पाटकुळ, खुनेश्वर, डीकसळ आणि भैरववाडी या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी जळून चाललेल्या पिकांची पाहणी केली. विशेषतः पावसाअभावी करपलेल्या सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची स्थिती पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व भरीव नुकसानभरपाई तसेच सर्वतोपरी मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

पावसाअभावी हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांसमोर जळून जात असताना शेतकरी मोठ्या संकटात आहे. या दुःखाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी एकजूट आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभी असून, त्यांना शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

 

या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी परिसरातील विविध विकासकामांच्या मागण्याही खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर मांडल्या. शिरापूर उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, खुनेश्वर गावाला उजनीचे पाणी मिळावे, तसेच डीकसळ येथील पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करून नादुरुस्त रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या. रस्ता खराब झाल्यामुळे एस.टी. बससेवाही बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

 

खासदार प्रणिती शिंदे यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, लक्ष्मण मगर, मोहन चव्हाण, चंद्रहार चव्हाण, शंकर चव्हाण, बाळासाहेब आतकरे, विकास पाटील, ब्रह्मदेव चव्हाण, मगर सरपंच, वसंत चव्हाण, रामहरी जाधव, संभाजी वऱ्हाडे, अशोक खोत, बजरंग पाटील, महादेव येमले, आशिष खोत, विकास चव्हाण, नवनाथ घाडगे, बजरंग पाटील, युवराज रणदिवे, रणजीत धावणे, राजेंद्र मोटे, रुपाली आडसुळ, संभाजी सातपुते, दत्ता सावंत, शिवाजी वसेकर, वीर सेन देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, लोंढे गुरुजी यांच्यासह शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *