👁
0
Views
राजकारण न्यूज डॉट कॉम नेटवर्क
सोलापूर, दि. 26
पाकणी-चिंचोली एमआयडीसी परिसरातील कृष्णा केमिकल कंपनीच्या आवारात साळींदर हा वन्यजीव जखमी अवस्थेत आढळून आला. या साळींदरावर श्वानांनी हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी साळींदराची माहिती कंपनीचे वॉचमान महिंद्र साठे यांनी योगेश चौरे यांना फोनवरून कळवली. ही माहिती मिळताच योगेश चौरे यांनी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूरचे सुरेश क्षीरसागर व संस्थेच्या सदस्यांना सांगितली. माहिती मिळताच WCAS च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. WCAS च्या सदस्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत साळींदराला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. त्यानंतर त्याला वनविभागाच्या टी टी सी सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
काटेरी अंगामुळे सहज ओळखला जाणारा वन्यजीव
साळींदर हा निशाचर आणि मुख्यतः शाकाहारी वन्यजीव असून तो उंदीरवर्गीय प्राण्यांमध्ये मोडतो. त्याच्या शरीरावर असलेल्या टोकदार काट्यांमुळे तो सहज ओळखता येतो. धोका जाणवल्यास साळींदर हे काटे ताठ करून स्वतःचा बचाव करतो. तो प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सक्रिय असतो आणि मुळे, कंद, फळे, वनस्पती तसेच इतर उपलब्ध अन्न खातो. परिसंस्थेमध्ये त्याचे महत्त्वाचे स्थान असून वन्यजीव साखळीचा तो एक भाग आहे.
एमआयडीसी परिसरात मानवी वस्ती आणि वन्यजीवांचा संपर्क वाढत असल्याने अशा घटना घडत आहेत. वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी त्याला पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभाग अथवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वन्यजीव बचाव कार्यात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूरचे सुरेश क्षीरसागर, योगेश चौरे, राहुल दोरकर, अमित कटाळे, अजय चव्हाण व वन विभाग रेस्क्यू टीमचे मुन्ना निरवणे, प्रवीण जेऊरे यांनी सहभाग घेतला.
Leave a Reply