
अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५, तर प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचे वितरण होणार
सोलापूर, दि. ३० : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना डिसेंबर २०२६ महिन्यासाठी नियमित अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर शहरातील रास्तभाव धान्य दुकानांसाठी अन्नधान्याचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले असून, लाभार्थ्यांना विहित परिमाणानुसार धान्य वितरित करण्याचे निर्देश अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५ किलो, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिकार्ड २२ किलो तांदूळ व १३ किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू वितरित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता राखण्यासाठी आधार संलग्न ई-पॉस (e-POS) मशीनद्वारेच अन्नधान्याचे वितरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे रास्तभाव दुकानदारांनी मॅन्युअल पद्धतीने धान्य वितरण न करता ई-पॉस मशीनद्वारेच वितरण करावे. तसेच लाभार्थ्यांना विहित परिमाणात धान्य मिळत असल्याची खात्री परिमंडळ अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
डिसेंबर महिन्यातील अन्नधान्य वितरणासाठी शासनाचे नियतन आणि रास्तभाव दुकानांची मागणी विचारात घेऊन धान्याची उपलब्धता व वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. धान्याची उचल आणि रास्तभाव दुकानांपर्यंत वाहतूक करण्यासाठी रूट ऑप्टिमायझेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून, त्यानुसार गोदामनिहाय धान्याचे वितरण केले जाणार आहे.
कारवाईचा इशारा
अन्नधान्य वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत पूर्ण प्रमाणात धान्य मिळावे, यासाठी संबंधित अधिकारी व रास्तभाव दुकानदारांनी दक्षता घ्यावी. वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिला आहे.
















Leave a Reply