गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील 


0
Views

गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील 

राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती 

ठाणे, दि. 6- मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिले पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रविवारी केले.

 

ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी नाही बसू शकत. पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही. आपण धर्माभिमानी असले पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केले जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष व्हावे. बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावे म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जात आहे असेही ते यावेळी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून व्हिडीओ करून भारतीयांना सांगतात की परदेशात जाऊ नका. सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे आपल्याला सांगितले जाते की आपला जीडीपी वाढला. हे कसं शक्य आहे?

 

देशाची अर्थव्यवस्था डगमगली याचा परिणाम म्हणून ज्याप्रकारे सध्या पेपर फुटी व शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर आले त्याप्रकारे उद्या आख्खा देश रस्त्यावर येईल. माझे हे वाक्य अत्यंत गंभीर आहे.

 

503 कंपन्यांचे कामकाज बंद,

13000 हजार उद्योगपती देश सोडून गेले 

आपल्या देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातले कामकाज बंद केले. यातून किती जणांचे रोजगार गेले असतील याचा विचार करा. २०१८-१९ पासून आजपर्यंत भारतात २००-२५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे साधारण १३००० उद्योगपती देश सोडून गेले. जर देशाचा जीडीपी ७.८ टक्के आहे तर हे उद्योगपती देश सोडून का जातात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत 

सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला 

२०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना?

 

नागपुरात डी जे बंदी मग

महाराष्ट्रात का नाही?

डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली आहे.डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *