
खासदार ज्योती वाघमारे यांना
श्रीलंकेत ऐतिहासिक सोहळ्याचे विशेष निमंत्रण
सोलापूर, दि. 30- सोलापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीच्या क्षेत्रातील योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याचे चित्र श्रीलंकेत पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या ‘भीमकन्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे छायाचित्र श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मैत्री सेतू’ या शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या बॅनरवर झळकले आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी त्यांना सन्माननीय अतिथी म्हणून विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ‘मैत्री सेतू’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि सांस्कृतिक ऐक्याचा विचार दोन्ही देशांमध्ये अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या निमंत्रित मान्यवरांमध्ये प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा समावेश झाल्याने या कार्यक्रमाला सोलापूरच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रीलंकेतील भूमिपूजन सोहळ्याकडे लक्ष
श्रीलंकेतील बियागामा येथील श्री बोधिद्रुमारामया पुराण विहारया येथे शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मैत्री सेतू’ शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले असून, कार्यक्रमाच्या प्रसिद्धी बॅनरवर त्यांचे छायाचित्र झळकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा कार्यक्रमात सोलापूरच्या लोकप्रतिनिधीला स्थान मिळाल्याने शहराच्या सामाजिक आणि वैचारिक परंपरेची चर्चा होण्याची संधी निर्माण झाली आहे. या सोहळ्यास श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिणी अमरसूर्या, लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे बौद्धशासन मंत्री प्रा. हिनिदुमा सुनील सेनेवी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रणपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारत-श्रीलंका संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक जागर
‘मैत्री सेतू’ या उपक्रमामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पूज्य अनागारिक धम्मपाल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची संकल्पना आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविणे, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, बंधुतेची भावना दृढ करणे आणि सांस्कृतिक संवाद वाढविणे, या उद्दिष्टांना या उपक्रमातून महत्त्व दिले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश भारतापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, या व्यापक विचाराशी अशा उपक्रमांचे महत्त्व जोडले जाते. भारत आणि श्रीलंका या देशांतील बौद्ध परंपरा, ऐतिहासिक संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो.







Leave a Reply